Art Should Comfort the Disturbed and Disturb the Comfortable -Cesar Cruz
TwitterLiked the quote? Tweet it!
see all quotes

२०२३-०८-०५ समालोचन - विदूषी कुमुदिनी काटदरे गुरुपौर्णिमा उत्सव दि ५ व ६ ऑगस्ट २०२३


Note: To be able to read this Marathi text, please ensure you have set View->Character Encoding to Unicode (UTF-8) in your browser.

पूर्वपीठिका

भारतीय परंपरेत सर्व शिष्यांतर्फे 'गुरुपौर्णिमा' हा उत्सव, चांद्रमासीय पंचांगाप्रमाणे आषाढ पौर्णिमेला साजरा केला जातो. शिष्याचा विषय कोणताही असो, मातीची मडकी तयार करण्यापसून ते थेट आध्यात्मिक प्रगती साधण्यापर्यंत - त्यात मध्ये गणित व संगीतही आलेच - हा दिवस महत्वाचा असतो. हा दिवस असतो कृतज्ञतेचा, हृद्य आठवणींचा, गुरूबंधू - भगिनींच्या गाठी-भेटींचा, गोड-धोडाचा, तसेच शिकलेली कला, विद्या किती आत्मसात केली हे आजमावण्याचा.

माझ्या महितीतले बहुतांश कला शिक्षक/गुरू हे नम्र भावनेने सवत:ला गुरू न म्हणवता, आपल्या गुरुपरंपरेतल्या साखळीतला एक दुवा म्हणून स्वत:कडे बघतात. त्या दान-यज्ञातील एक आहुती म्हणून स्वत:च्या ज्ञान-दानाच्या कार्याकडे बघतात. जे विश्वव्यापी सर्वज्ञ गुरूतत्व, अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे कार्य करते त्याचे, म्हणजेच सर्व ज्ञानाची गंगोत्री असणाऱ्या आदिगुरू शिवशंकराचे, एक समजायला सोपे स्वरूप म्हणून शिष्यवर्ग आपल्या मनुष्यरूपी गुरूंकडे पहात असतो व त्यांना नमन करत असतो, गुरूपूजन करत असतो.

या वर्षी जयपूर गायन परंपरेतल्या गुरू, वाग्गेयकार विदूषी कुमुदिनी काटदरे यांच्या शिष्यवर्गाचा कार्यक्रम दि ५ व ६ ऑगस्ट ला संपन्न झाला. त्यांच्या कन्या व शिष्या धनश्री घाटे यांच्या घरी आयोजन केले होते. बैठकीत कुमूदताईंच्या गुरुंचे म्हणजे गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांच्या शिष्या विदूषी कमलताई तांबे व उस्ताद भुर्जीखान साहेब यांचे शिष्य मधुसूदन कानेटकर यांची छायाचित्रे स्थापित व फुलांनी सुशोभित होती.

असे कार्यक्रम अत्यंत घरगुती वातावरणात व अनेक वर्षांचा ऋणानुबंध असलेल्या, एका छत्रा खाली ज्यांच्या सोबत एकत्र सांगीतिक प्रगती केली अशा आपुलकीच्या माणसांसोबत होत असल्याने एक वेगळांच आनंदी माहोल असतो. तसेच घरच्या बैठकीच्या खोलीत, सभागृहापेक्षा खूप कमी जागेत, कलाकाराच्या जवळ दाटीवाटीने बसलेल्या श्रोत्यांशी कलात्मक जवळीक चांगली साधली जाते. कलाकारचं सांगणं व श्रोत्यांचे अभिप्राय यांची देवणघेवाण अधिक चांगली होते व कलाकाराला व पर्यायाने कलेच्या उत्तम आविष्काराला पूरक ठरते.

पारंपारिक वातावरणाचं अजून एक वैशिष्ठ्य असतं ते म्हणजे प्रत्यक्ष तानपुरा साथ. कलाकार एक किंवा दोन तानपुरे व ते वजवणारे शिष्य साथीला घेतात. शिष्य तयारीचे असतील तर ते गायन साथ ही करतात. तानपुरे सुरात जुळवण्याची विषेश दक्षता घेतलेली असते. अधुनिक काळातला इलेकट्रॉनिक अथवा मोबाइल अॅप चा तानपुरा असतोच असं नाही, आणि असला तरी संदर्भ म्हणजेच रेफरेन्स पुरता.

मैफलीत असे प्रत्यक्ष तानपुरे वाजत असतील तर वातावरण त्याने भारून जातं. साथीला गाणाऱ्या शिष्यांना आपल्या गुरूंकडून मैफिलीत ‘लाईव’ शिकता येतं. त्यात गायनाबरोबर गायनाचं प्रस्तुतीकरणही शिकत येतं. मंच प्रदर्शनाची सवय होते, भीती (स्टेज फ्राइट) रहात नाही. योग्य वेळीला योग्य प्रमाणात केलेले पूरक आलाप, ताना, तसेच गुरूंचे आलाप व ताना संपताना मध्य व द्रुत लयीत त्यांच्या बरोबर गायलेला मुखडा, लय बदलत असताना तबला साथीदाराच्या वादनाला आधार व संदर्भ देण्यासाठी वारंवार गायलेली चीजेची पहिली ओळ, या व अशा अनेक प्रकारच्या शिष्यांच्या पूरक साथीने गाणे भारदस्त होते. गाणे एकट्या कलाकाराचं प्रस्तुतीकरण न राहता, मुख्य कलाकाराच्या पुढाकाराने केलेले सामुहिक सादरीकरण (टीम वर्क) होते, व श्रोत्यांना अधिक आनंद देणारे, अधिक परिणामकारक होते. या कार्यक्रमात हे सर्व अनुभवता आले.

तसेच, या कार्यक्रमात प्रामुख्याने जयपूर परंपरेचा शिष्यवर्ग असल्याने या परंपरेची वैशिष्ठ्ये अनुभवता आली. विलंबित त्रितालातील अनेक बंदिशी, पारंपारिक रचना, स्पष्ट शब्दोच्चार, स्पष्ट आकारयुक्त गायन, तसेच लांब, पल्लेदार, खास आकृतिबंध व संरचना असलेल्या ताना, विलंबित लयीत विस्तार करायच्या आधी स्थायी व अंतरा दोन्ही गाणे, हे सर्व वेगवेगळ्या कलाकारांकडून वेगवेगळ्या प्रमाणात अनुभवता आले. कुमूदताईंनी रचलेल्या विविध तालातल्या व लयींच्या बंदिशी ऐकायला मिळाल्या हे या कार्यक्रमाची अजून एक खास बात.

सत्र १

पहिले सत्र शनिवार दि. ५ रोजी सायं ४ ला नियोजित वेळेवर सुरू झाले.

प्रथम बिनता फडके यांनी राग पूर्वा कल्याण सादर केला ज्यातील सर्व बंदिशी कुमूद ताईंच्या आहेत.

विलंबित त्रिताल :

स्थायी :

सांझ भई भज रे हरी को, ता बिन नाही आधार

अंतरा :

एक कृपानिधी सबको राखे वोही करे बेडा पार

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

सुमिर मना रे हरि चरन

अंतरा :

सांझ भई रे दिन बीता

दृत लय त्रिताल :

स्थायी :

तन देरेना देरेना देरेना तनन देरे

अंतरा :

ओदानी ओदानी दानी दिर दिर तन देरेना

त्या अंदाजे १५ मिनिटे खयाल गायल्या मग लय वाढवून बोल आलप व ताना. तार षडजा च्या वर त्या फार गायल्या नाहीत. दृत लयीतील तराणा, थोडी लय वाढवून गायला असता, तसेच अजून थोड्या ताना घेतल्या असत्या तर अजून उठावदार झाला असता. एकूण सादरीकरण छान झाले.

या नंतर अमृता कुलकर्णी यांनी राग मधुवंती सादर केला.

विलंबित त्रिताल :

स्थायी :

कल नाही आये मोहे बलमा तुमरे कारन सब जग सूना

 

अंतरा :

समझत नाही कैसे समझाऊ कासे कहू जिया के बैना

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

मन भावन मोरे पिया रे, बिरह सतावे , कछु ना सुहावे

 

अंतरा :

अब न करो तुम मेरो मन बसिया

नाट्यपद :

 

खरा तो प्रेमा

त्यांच्या विलंबित त्रिताल याची लय नेहमी प्रमाणे होती. त्यांनी खयाल गाताना तार सप्तकातही भरपूर ताना घेतल्या. एकूण सादरीकरण छान झाले.

या नंतर मैत्रेयी बर्वे यांनी राग तिलंग प्रस्तुत केला.

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

कान्ह मुरली वाले नंद को छैल, बासुरी बजाये

अंतरा :

फेर सुनादे मोहन मुरली, कदर पिया की अरज ले मान

चित्रगीत :

छोटासा बालमा

त्यांनी गायलेले चित्रगीत खूपच छान झाले. एकूण सादरीकरण छान झाले.

या नंतर धनश्री घाटे यांनी राग मुलतानी प्रस्तुत केला.

विलंबित त्रिताल :

स्थायी :

कवन देस गये पिया मोरा बालम रे लोगवा कहत

अंतरा :

ना जानू कहां

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

अजहू न आये बालमवा, बहुत दिन बीते माई

अंतरा :

जब से गये मोरी सुधहू न लीनी, किस बिरमामे चैन न आवे

दृत लय त्रिताल :

स्थायी :

तोन तनन देरेना देरेना, दीम तनन दीम दीम तन देरेना

अंतरा :

देरेना देरेना दीम

भजन :

श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल

त्यांचे सादरीकरण खूपच छान झाले. खयालामध्ये जयपूर परंपरेचा स्वरलगाव स्पष्टपणे दिसला. त्यांनी भरपूर पल्लेदार आकृतिबंद ताना घेतल्या. मध्य लय बंदिश कुमुद ताईंची रचना आहे व तराणा ही त्यांचाच आहे. संपूर्ण सादरिकरणामध्ये मुलतानीची ओळख कायम दिसत होती. शेवटी त्यांनी बिहाग रागातील विमल कृष्ण कृत भजन गायले, ज्याला स्वर कुमुदताई यांनी दिलेत.

जयपूर परंपरेतल्या (कमलताईंच्या / कुमुदिनीताईंच्या) शिष्या, इन्दूर च्या शुभदा मराठे यांचे काही महिन्यांपूर्वी दु:खद निधन झाले. त्यांचा या कार्यक्रमात नेहमी सहभाग असे व या ही वेळेला नियोजित होता. धनश्री घाटे यांनी त्यांच्या आठवणी सांगितल्या व त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांची जोग रागातील ‘दरस बिना तरसे अखिया’ (मध्य लय त्रिताल) याची यू ट्यूब वरील क्लिप सर्वांनी टीव्ही वर पाहिली.

या नंतर किशोरी कुलकर्णी यांनी सतारीवर राग पूरिया धनाश्री प्रस्तुत केला. त्यांनी वाद्य वादन शैली (instrumental style) प्रमाणे आलाप, जोड, 'पायलिया झनकार' ही परांपारिक गत व मग झाला, असे सर्व प्रस्तुत केले. त्यांची सतार अत्यंत सुरेल वाजली. त्यांनी लयदार व अनेक तिहाई युक्त असे वादन केले. त्यांनी शेवट एका चक्रदार तिहाई ने केला. एकूण सादरिकरण खूप प्रभावी झाले.

या नंतर निनाद देव यांनी राग तिलक कामोद प्रस्तुत केला.

विलंबित मध्य लय त्रिताल :

स्थायी :

बमना एक सुगन विचार

अंतरा :

मंगल गावो चौक पुरावो

दृत लय एकताल :

स्थायी :

मन मे मोहन बिराजे

अंतरा :

सुमिरन को ना भयो

त्यांनी स्त्री व पुरुष असे दोन तानपुरा साथीदार घेतले होते, दोघांनाही माईक दिला होता व दोघेही योग्य पट्टीत साथ करत होते. विलंबित लय नेहमीपेक्षा थोडी चढलेली होती. याला विलंबित मध्य लय असे ही म्हणता येईल. बंदिश १० व्या मात्रेपसून सुरू होते. गाण्यात शब्दयुक्त विस्तार व शब्दयुक्त तानांचे बरेच प्राबल्य होते. आकारयुक्त गायन अल्प होते. एकूण सादरीकरण छानच झाले.

शेवटी मंजिरी आलेगावकर यांनी राग बागेश्री प्रस्तुत केला.

विलंबित मध्य लय त्रिताल :

स्थायी :

बलमा रे दरस दिखलावो

अंतरा :

लगन मोहे लागी दरसन की

दृत लय एकताल :

स्थायी :

दीम दीम दीम तनोम् देरेना

अंतरा :

दानी दानी ओदानी

निर्गुणी भजन :

गुरुजी मै तो एक निरंजन ध्याऊं जी दूजे के संग नही जाऊंजी

बागेश्रीतील दोन्ही बंदिशी कुमुदताईंच्या आहेत. पहिल्या बंदिशी ची लय नेहमी पेक्षा बरीच चढी होती. ‘दिखलावो’ यातील ‘दि' वर सम आहे. त्यांचे आलाप शब्दयुक्त, खूप वैविध्य पूर्ण होते. त्या आलापा मध्ये ‘अतीत’ सम दाखवत होत्या. ताना आकारयुक्त होत्या. त्यांच्या गायनात पंचम-बागेश्री रागाचा प्रभाव जास्त जाणवत होता. तसेच त्यांनी रे ग म संगतीचा भरपूर वापर केला. एकतालातील तराणाही त्यांनी छानच सादर केला व छानश्या तिहाई ने रागाचा शेवट केला.

त्यांनीही स्त्री व पुरुष असे दोन तानपुरा साथीदार घेतले होते, दोघांनाही माईक दिला होता व दोघेही योग्य पट्टीत साथ करत होते. पूर्वी पुरुष गायकांना पुरुष साथीदार व स्त्री गायकांना स्त्री साथीदार अशी पद्धत जास्त प्रचलित होती. स्त्री व पुरुष असे मिश्र साथीदार क्वचित दिसायची. आजकाल अशी साथ बऱ्याच् प्रमाणात दिसते. गुरू दोन्ही शिष्यांना तालीम देतात हे त्यांचे कसब आहे व शिष्य आपल्यापेक्षा वेगळ्या पट्टीत चांगली साथ करतात हे त्यांचे कसब आहे. जरी वेगळ्या पट्टीत गाताना सर्व सप्तकांत संचार करता येत नसला तरी एकूण कलाविष्कारामध्ये याने काही उणेपण येते असे वाटत नाही, उलट वैविध्यतेची भरच पडते.

शेवटी त्यांनी 'गुरूजी' हे निर्गुणी भजन सादर केले. या भजनातील स्वर समूहांचा जणु न्यास असणारा कोमल रिषभ निव्वळ जादुई आहे. या भजनाला सिद्ध गानऋषींची उज्ज्वल परंपरा आहे. पं कुमार गंधर्व, वि. वीणा सहस्रबुद्धे यांची आठवण नाही झाली तरच नवल. मंजिरी ताईंच्या गायनाने श्रोतावर्गाचे हृदय दाटून आले, तर काहींच्या डोळ्यातून ते प्रकटही झाले. गुरुसमर्पणाने भारलेली मने पहिल्या सत्राचा शेवट करून दुसऱ्या सत्रासाठी आतुर होऊन विश्राम घेती झाली.

सत्र १

दुसरे सत्र रविवार दि. ६ रोजी सकाळी १० ला नियोजित वेळेवर सुरू झाले.

प्रथम साधना इतराज यांनी राग अहिर भैरव सादर केला.

विलंबित त्रिताल :

स्थायी :

जानकी जीवन राम

अंतरा :

दीन दयानिधी

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

नित्य नित्य सुमिरन करे, मन मेरो राम रतन धन नाम तिहारो

अंतरा :

ध्यान धरो हे दाता हम पर, तुम बिन कौन सवारे मोहे

मोकळा आवाज, स्पष्ट आकार, स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांच्या गाण्याची विशिष्ठ्ये दिसली. पहिल्या बंदिशी ची लय नेहमी प्रमाणे होती. एकूण सादरिकरण खूप प्रभावी झाले.

या नंतर शोभा अरगडे यांनी राग यमन मधील दोन भजने सादर केली.

भजनी ठेका :

महाराज तुम दाता

भजनी ठेका :

विनवी नामा विठुरायाला

पहिले भजन हे सद्गुरूंवर (नाना महाराज) कुमुदताईंनी रचलेले भजन आहे. दुसरे संत नामदेवांचे भजन आहे त्यालाही कुमुदताईंनीच चाल लवली आहे. त्यांनी टाळ आणले होते व ते मधुरा फडके यांनी वाजवले, त्याने भजन अधिक उठावदार झाले. एकूण सादरीकरण छान झाले.

या नंतर नीता मुतालिक यांनी राग जौनपुरी प्रस्तुत केला.

विलंबित त्रिताल :

स्थायी :

पिहरवा जागो रे

मध्य लय त्रिताल :

स्थायी :

सजन गर लागेया सांडेया

अंतरा :

सांस सांस रटना जिया उनकी

मिश्र काफी, दीपचंदी :

बन को चले दोनो भाई, इन्हे कोई रोको रे भाई

त्यांच्या बोल-आलापामध्ये व तानंमध्ये जयपुरची परंपरेची कलाकारी व संमिश्रता (complexity) दिसली. खयालाची लय नेहमी प्रमाणे होती. जौनपुरी चांगला रंगला पण आसावरी पेक्षा थोडा अजून भिन्न वाटू शकला असता असे वाटले.

या नंतर त्यांनी मिश्र काफी रागातील बुंदेलखंडी ‘लेद’ गायकीतील रचना गायली. ही रचना शुभदा पराडकरांनी गायल्याची आठवण सांगितली. सहा किंवा आठ कडवी असलेली रचना असूनही मधली कडवी जलद लयीत असल्याने गाऊन लवकर झाली. एकूण सादरीकरण छान झाले.

या नंतर अंजली मालकर यांनी राग मिया मल्हार प्रस्तुत केला.

विलंबित झपताल:

स्थायी :

सखी कासे कहूं

अंतरा :

उमड घुमड कर

मध्य लय एकताल :

स्थायी :

मह्मदशा रंगीला रे

अंतरा :

उमड घुमड घन आये

दृत लय एकताल :

स्थायी :

तान देरेना दीम तोम

अंतरा :

ओदन दीम त दीम तनन

त्यांच्या पहिल्या दोन्ही बंदिशी प्रेमरंग यांच्या आहेत व तराणा वि. वीणा सहस्रबुद्धे यांचा आहे. त्यांनी मल्हार रागाच्या मंद्र सप्तकात केलेल्या विस्ताराने पावसाळ्याच्या धीर गंभीर वातावरणात समयोचित रंग भरले. विलंबित लयीतल्या जयपूर परंपरेच्या लांब पल्लेदार ताना, मध्य लय बंदिशीला दिलेला न्याय, व तडफदार तराणा, सर्व एकूण छानच झाले.

या नंतर पद्मिनी दांडेकर यांनी राग भूपाल तोडी प्रस्तुत केला.

विलंबित रूपक:

स्थायी :

भोर भई निरख देखी सुंदर छवी वाकी

अंतरा :

ब्रम्ह महूरत सूर ताल नाद भेद सब दिखाई

दृत लय एकताल :

स्थायी :

दिर दिर तनोम तनन तदियन

अंतरा :

ना दिर दिर दीम त दीम तान

बैरागी, रूपक :

भावगीत:

सावल्यांच्या अंतरंगी रूप तुझे बिंबले

यांनी सर्व स्वरचित यांनी सादर केल्या. खयालाची लय ठाय होती. तराण्याची सम ‘तनोम’ च्या ‘त’ वर होती. एकूण सादरीकरण छान झाले.

इथे मला माझे प्रथम गुरूजी पं. राम माटे यांची खूप आठवण झाली. आमच्या सर्व कार्यक्रमांत रागांच्या प्रस्तुतीकरणाचा क्रम रागांच्या समयानुसारच असायचा. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे एक प्रमुख वैशिष्ठ्य म्हणजे राग-समय-चक्र. प्रत्येक रागाला त्याची स्वत:ची अशी वेळ आहे, व तो त्याच वेळी गायला जातो. त्यामुळे राग सादरिकरणाची वेळ व रागची वेळ ही सारखी असते. तसेच आधीची वेळ असलेला राग हा आधी गायला जातो व नंतरची वेळ असलेलेला राग हा नंतर सादर केला जातो. असे केल्यामुळे तो रागच नाही, तर संपूर्ण कार्यक्रम जास्त परिणामकारक होतो. काही रागांचे समय सारखे असतात व असे राग एकमेकांच्या आधीही व नंतरही गायले जाऊ शकतात. या तत्वाची काळजी घेऊन योजलेला, सादर केलेला कार्यक्रम, श्रोत्यांना चढत्या क्रमाने आनंद देतो, रंगतो, याचा अनुभव आपण प्रयोग करून स्वत: घेऊ शकतो.

अर्थातच, यासाठी बाकी निकषही असतात, गुरूंनी कार्यक्रम मांडणीमागचा केलेला विचार, गाणारे कलाकार यांची ज्येष्ठता, संपूर्ण कार्यक्रमाला गुंफणारं विशिष्ठ सूत्र आहे का आणि असेल तर काय आहे, एखाद्या गाण्याच्या आधी व नंतर गायन आहे अथवा वाद्य वादन आहे, वाद्य कोणते आहे, एकूण किती कलाकार आहेत व प्रत्येकाला दिलेली वेळ किती आहे, विशिष्ठ साथीदारांची उपलब्धता, या व अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात.

इथे जवळ जवळ सारंग ची वेळ झाली होती व या आधीचा मिया मल्हार छान झाला होता. या पार्श्वभूमीवर , भूपाल तोडी जर तोडीच्या वेळेनुसार थोडा आधी प्रस्तुत झाला असता, तर रागाचा असर जास्त जाणवला असता, असे या सर्व विचारापासून अनभिज्ञ असलेला एक श्रोता म्हणून वाटले. असो.

यांना डॅा. अंजली दाणी - संवादिनी व सतीश कानडे तबला अशी साथ होती. बाकी सर्व कलाकारांना, दोन्ही दिवस गंगाधर शिंदे - पेटी व पुष्कर महाजन - तबला यांनी छान साथ केली. वेगवेगळ्या कलाकारांबरोबर वेगवेगळ्या तालात व लयीत, शास्त्रीयच नाही तर भजने, भावगीते व लोकसंगीतही समर्थ पणे वाजवल्या बद्दल पुष्कर महाजन यांचे विशेष कौतुक. नितिन पाटील यांनी ध्वनि व्यवस्था उत्तम पाहिली. सर्व साथीदारंचे कुमूदताईंच्या हस्ते पुष्प देऊन कौतुक करण्यात आले.

शेवटी मधुवंती देव यांनी राग मधमाद सारंग प्रस्तुत केला.

विलंबित रूपक:

स्थायी :

सखी ब्रिज के खिवैय्या

अंतरा :

झूमे झूमे सब

दृत लय त्रिताल :

स्थायी :

रंग दे रंगरेजवा

अंतरा :

ऐसी रंगादे सुरंग चुनरिया

भैरवी भजन :

हरी बिन तेरो कौन सहाय

यांच्या साथीला तानपुऱ्यावर दोन्ही गाणाऱ्या विद्यार्थिनी होत्या व त्यांनी पूरक साथ केली. खयालाची लय ठाय होती. खयालाची बढत शांत व सौंदर्यपूर्ण होती. लय वाढवल्यावर लांब पल्लेदार ताना, खूप वैविध्य असलेल्या, अनेक आवर्तनांच्या ताना, लयीच्या ताना, असे सर्व प्रकार ऐकता आले. जयपुरची परंपरेची कलाकारी व संमिश्रता (complexity) संपूर्ण गाण्यात दिसली. एकूण सादरीकरण छानच झाले.

गुरू नानक यांचं कुमुदताई यांनी चाल लावलेल्या भैरवी भजनाने दोन दिवस उत्तमपणे आयोजलेला कार्यक्रम संपन्न झाला. गाणं संपलं खरं, पण कोणाची उठायची इच्छा होत नव्हती. गुरूस्मरणाने भारलेलं सूरमय वातावरण बदलावं असं कोणालाच वाटत नव्हतं. काही क्षणांच्या शांततेनंतर मग सर्व श्रोत्याच्या भूमिकेतून बाहेर आले. गप्पांतून गेल्या दोन दिवसांचा धावता आढावा घेण्यात आला. गाणं सादर केलेल्या कलाकारांबरोबर अभिनंदन व अभिप्राय यांची देवाण-घेवाण झाली. गुरू कुमुदिनीताईंबरोबर छायाचित्र घेण्यात आली. अशा प्रकारे आनंदात सर्वांची पाउले आपापल्या घराकडे वळली.


Tags: Indian, Classical, Music, Raga, Vidushi Kumumdini Katadare


All comments sent via email to this address will be moderated and posted here. Assuming you won't want to be spammed, I will not share your email address or web address unless you explicitly mention in the email :)

Message in Public Interest
Laughing ...

About

Human. Professional. Technologist. Musician. Naturophile. Linguaphile. Traveller. Philosopher. Friend. Don't-Worry-Be-Happy-ist.